मैत्री
दिना निमीत्त फार पुर्व (सन
२००९ मध्ये) लिहीलेल्या लेखाची आठवण झाली.. आणि म्हणून सादर
मैत्री
(Friendship)
मैत्री!
तुम्ही म्हणाल आता मैत्रीवर काय नवीन सांगणार? अमूक-तमूक माझी मैत्रीण
आहे..तिच्यात-माझ्यात मैत्री आहे..बस एवढी सोपी असते “मैत्री”.
सहज
म्हणून कुणच्याही खांद्यावर हात मारून “मित्रा” म्हणा, पहा समोरची व्यक्ती अनोळखी
असली तरी हसून तुम्हाला दाद देते की नाही? “मित्रा...तोडलस” म्हणणाऱ्या अवधूत गुप्तेंची
दाद मनाला भिडते, ती याचसाठी. खरच, जादूई शब्द आहे मैत्री.
मला
आठवते, लहानपणी “मैत्रीण” हा शब्द मला उच्चारताही येत नव्हता तेव्हा माझ्याच
वयाच्या चिमुरडया मैत्रीणींसाठी मी माझ्या सख्या भावंडाशी कित्येकदा भांडलेय. या
मैत्रीची जादु कदाचीत माझ्या त्या बालमनालाही हवीहवीशी वाटत होती.
असे
म्हणतात, तुमची रक्ताची नाती तुम्ही निवडू शकत नाहीत कारण तिथे तुम्हाला चॉईस नसतो
पण तुम्ही तुमचे मित्र मात्र नक्कीच निवडू शकता आणि म्हणूनच माणूस कसा आहे हे त्याचा
मित्रपरिवार बघून सांगता येते.
आपल्याकडे
मैत्रीची परिसीमा दर्शवणारी अनेक उदाहरणे सांगितली जातात, कृष्ण-सुदामा,
कर्ण-दुर्योधन ही दोनच उदाहरणे खुप काही सांगून जातात. कर्णाचा मान दुर्योधनाने
जपला-फुलवला पण अधोगतीला जाणाऱ्या दुर्योधनाला रोखण्यात कर्ण आपल्या मैत्रीचा वापर
करू शकला नाही, हे दुर्देव.
पण
तोंडओळख झाली, २-४ वेळा बातचीत झाली की अमूक-तमूक माझा चांगला “मित्र” आहे असे
सांगणारे महाभागही असतात. त्यांना कदाचीत मैत्रीचा अर्थच कळलेला नसावा.
आपल्या
सुखाच्या-दु:खाच्या क्षणी ज्याची तिव्रतेने आठवण होते, ती व्यक्ती आपली “मित्र”
असते. जिच्या खांदयावर आपण निशंक मनाने डोक ठेवतो, जिच्यापुढे आपण आपले मन मोकळे
करतो, जिच्या सोबत खळखळून हसतो, निसंकोच
जिच्यासमोर रडू शकतो..मुळात जिच्या असण्या-नसण्याने फरक पडतो ती व्यक्ती म्हणजे
तुमचा “सखा”.. तुमचा “मित्र”- “मैत्रीण”.
मैत्रीची
गंमत अशी आहे आयुष्यातील वाईट मित्रही तुमची साथ अगदी स्मशानापर्यंत देतात. स्वत:
तुमच्या आनंदात पितात-तुम्हालाही पाजतात..तुमच्या गममध्ये ते जास्त डुबतात, ही
देखील मैत्रीच पण मैत्रीची ही वाईट प्रत आहे.
जी
व्यक्ती आपल्या वाईट सवयी मित्राला लागू नयेत याची काळजी घेते, तीच तुमची खरी “मित्र”-
“मैत्रीण”. जी व्यक्ती कडू असले तरी सत्य सांगते, वेळप्रसंगी २-४ शब्द सुनावते, ती
तुमची खरी “मित्र”- “मैत्रीण”.
मैत्री
स्वार्थी कधीच नसते, खोटया तारीफेची मोहताज
नसते..गरीब-श्रीमंत,जात-पात,धर्म,स्त्री-पुरूष,उच्च-निच,वयाचा फरक या सिमा
मैत्रीला नसतात. समोरच्याची मैत्री आपल्या सो कॉल्ड स्टेटसला शोभेल का? या
विचारातुन पास होवुन जी मैत्री होते ती मुळात मैत्रीच नाही. केवळ समोरच्याचा सहवास
आपल्याला आवडतो बस हा विचार जिथे पुरतो..व तो किंवा ती माझा-माझी मित्र किंवा
मैत्रीण आहे हे सांगताना लाज वाटत नाही तिच खरी मैत्री.
असेही
असू शकते की तुमची “मैत्री” ही एकतर्फीच असेल. तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचा मित्र
किंवा मैत्रीण समजता, त्या व्यक्तीसाठी तुम्ही एक चांगले ओळखीचे असाल वा
खेळण्याचे- टाईमपासचे एक साधनही असाल म्हणूनच एखाद्याला चांगला मित्र किंवा
मैत्रीण म्हणण्यापुर्वी “Pause” घ्या, खात्री करा की तो किंवा
ती तुमच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतेय? तिची-त्याची काय अपेक्षा आहे.
मैत्रीला
नात्याचे स्वरुप/ नाव देण्याचाही काही दुराग्रह करतात. पण मैत्री हा असा हिरा आहे
की ज्याला नात्याचे कोंदण देण्याची गरजच
नाही. स्त्री-पुरूषातील मैत्री आजही आपला समाज खुल्या दिलाने स्विकारत नाही, का?
घराबाहेर कामानिमीत्त आठ-आठ तास एकत्र राहणऱ्या लोकांच्यात मैत्री होणे स्वाभावीक
आहे, पण मग अशा मैत्रीकडे कुत्सीतपणे पाहणे योग्य आहे का?
मुळातच
मैत्री ही वैचारीक भावना आहे, कदाचीत गरज आहे. एकाच विचारांच्या-आचारांच्या
लोकांमध्ये शक्यतो मैत्री होते, कधी-कधी मात्र पुरक म्हणजेच ज्या गुणांचे आकर्षण
आहे ते गुण ज्यांच्यात आहे त्यांच्याशी आपली मैत्री होते. विचारांची देवाण-घेवाण होते. आपल्या सर्व
सुख-दु:खात मित्राला सामील करावे, त्याचे सुख-दु:ख आपण वाटावे एवढी निरागस व मापक
अपेक्षा असते प्रेम एकतर्फी असू शकते पण मैत्री नाही कारण मैत्रीत संवादाची गरज
असते.
मित्र
किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे असते, तुमच्या सादेला प्रतीसाद देणारा,
हृदयाशी नाते जोडणारा एकच मित्र असला तरी चालेल पण जिवाला जिव देणारा असावा. आंधळे
प्रेम करणारा नको, पण स्वत:सह योग्य मार्गावर नेणारा हवा. पुस्तके म्हणूनच चांगले
मित्र होवु शकतात पण त्यातही चांगले-वाईट आहेच. व जिवंत मैत्रीची मजाच काही औरच
असते. अशी मैत्री मिळणे -असणे भागयच. अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर
त्या मैत्रीला जगवा, फुलवा. प्रेमाचे खत-पाणी घाला, विश्वासाचे कुंपण घाला, अजुन
मिळाला नसेल तर मिळवण्याचे प्रयत्न करा, जिवनाच्या प्रत्येक वाटेवर त्याची सोबत
अनमोल ठरेल.
⸶⸸⸷...⸸...⸶⸸⸷